पुणे : लॉकडाऊनमुळे मार्चनंतर प्रथमच वापरलेल्या विजेचे प्रत्यक्ष रिडींग जून महिन्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे ९० ते ९७ दिवस) वीजवापरानुसार युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. या युनिट संख्येला सुमारे तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही अशी ग्वाही देत वीजग्राहकांनी विश्वास ठेवावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. दरम्यान, जूनमध्ये मीटर रिडींगनुसार देण्यात येणारी वीजबिले अचूकच आहे. केवळ मीटर रिडरकडून अनावधानाने रिडींग घेण्यात काही चूक झाली असल्यासच वीजबिल चुकीचे असू शकते. मात्र महावितरणकडून रिडींगप्रमाणे देण्यात येणारी वीजबिल चुकीचे आहे हा गैरसमज ग्राहकांनी करून घेऊ नये असा स्पष्ट निर्वाळा वीजक्षेत्रातील तज्ञांनी देखील दिला आहे. ___ लॉकडाऊनमुळे एप्रिल व मे महिन्यात मीटर रिडींग उपलब्ध होऊ न शकलेल्या वीजग्राहकांना मागील तीन महिन्यांच्या वीजवापरानुसार सरासरी वीजबिल पाठविण्यात आले. मात्र जून महिन्यात मीटर रिडींगची प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे मार्चपासून ते जूनपर्यंत वीजवापरांची एकूण युनिट संख्या ही जूनच्या वीजबिलात नोंदविण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात ही युनिट संख्या केवळ जून महिन्याची नाही तर लॉकडाऊनच्या कालावधीमधील सुमारे ९० ते ९७ दिवसांची आहे. या युनिट संख्येला तीन महिन्यांनी विभागून स्लॅबप्रमाणे ३१ मार्चपूर्वीच्या व १ एप्रिलनंतरच्या वीजदरानुसार बिलांची आकारणी करण्यात येत आहे. समजा जूनच्या बिलामध्ये एकूण ६१२ युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. तर तीन महिन्यांसाठी प्रत्येकी २०४ युनिटचा वापर झाला आहे असा हिशेब करून त्यातील पहिल्या १०० युनिटला ० ते १०० आणि दुसऱ्या १०४ युनिटला १०१ ते ३०० युनिट स्लॅबनुसार वीजदर लावण्यात येत आहे. यामध्ये आकारणी करण्यात आलेल्या एकूण रकमेत एप्रिल व मे महिन्यांचे वीजबिल भरलेले आहे असा हिशेब करून फिक्स चार्जेस व त्यावरील वीजशुल्क वगळून उर्वरित भरलेली रक्कम वजा करण्यात येत आहे. मात्र एप्रिल किंवा मे महिन्याचे बिल ग्राहकांनी भरलेले नसल्यास ते थकबाकी म्हणून दाखविण्यात येत आहे. याबाबतचा सपूर्ण हिशेब प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे.
* वाढीव बिलाबाबत महावितरणचे म्हणणे *